ट्रकच्या धडकेत तीन तरुण भक्तांचा अंत

Foto
तुळजापूरवरून ज्योत आणताना काळाचा घाला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : तुळजापूरहून आई तुळजाभवानी देवीची ज्योत घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या मोटारसायकलला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात खुलताबाद तालुक्यातील तीन तरुण भक्तांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर कचनेर फाट्याजवळ शनिवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडला.
या अपघातात अक्षय बिजलसिंह राजपूत (वय २८, रा. जाफराबादवाडी, ता. खुलताबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल अशोक औटे (वय ३२) आणि गोरख रावसाहेब म्हसकर (वय २८, दोघे रा. गोलेगाव गदाणा, ता. खुलताबाद) या
दोघांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शुभम अधाने (वय २०, रा. चिमणापूर वाडी, ता. खुलताबाद) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी कशी घडली घटना ?
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी देवीची ज्योत आणण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव गदाणा, चिमणापूरवाडी व जाफराबादवाडी परिसरातील तरुण गुरुवारी सकाळी तुळजापूरला गेले होते. तिथे दर्शन घेऊन शुक्रवारी हे सर्व भक्त ज्योतीसह परतीच्या प्रवासाला निघाले. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हे भक्त कचनेर फाट्याजवळ पोहोचले. यावेळी शुभम अधाने हा तरुण देवीची ज्योत हातात
घेऊन धावत होता, तर अक्षय, अमोल आणि गोरख हे तिघे त्याला मदत करण्यासाठी व ज्योतीत तेल घालण्यासाठी सोबत मोटारसायकलवरून चालले होते. पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकल आयशरच्या पुढच्या भागात अडकली.
तरीही ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव तब्बल तीन किलोमीटरपर्यंत (चिकलठाणा पुलापर्यंत) ती मोटारसायकल फरफटत नेली. पुढे चाललेल्या पिकअपमधील इतर भक्तांनी ही बाब पाहिली आणि शंका आल्याने त्यांनी मागे धाव घेतली. अपघाताचे भयानक दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले.
चार वर्षांची अखंड सेवा खंडित
नवरात्रीच्या दोन दिवस आधी तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घेणे आणि ज्योत घेऊन पहिल्या माळेला गावी पोहोचणे ही या तरुणांची गेल्या चार वर्षांपासूनची नियमित परंपरा होती. मात्र, या भीषण अपघातामुळे ही अखंड धार्मिक सेवा थांबली. अपघाताचे वृत्त समजताच मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील वातावरण सुन्न झाले होते. अपघातानंतर फरार झालेल्या आयशर चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions